वाढत्या महागाईच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

Foto
मुंबई: देशभरात वाढत्या पेट्रोल-डिझलसह वाढत्या महागाईच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने नवी मुंबईमध्ये आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मात्र नवी मुंबईच्या सिडको एक्सिबिशन बाहेर हा मोर्चा अडवण्यात आल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीसा संघर्ष बघायला मिळाला आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नवी मुंबईत आंदोलन करत असून या आंदोलनाला आता काहीसं हिंसक वळण लागलं आहे. यावेळी चूल मांडून, आणि भांडे वाजवून हे आंदोलन करण्यात आले आहे.

मात्र, यावेळी आंदोलकांना आंदोलन स्थळापर्यंत जाण्यापासून पोलिसांनी रोखून धरलंय. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक आणि ढकाला ढकली झाली आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेत्यांसह खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि उरण नगराध्यक्षा भावना घाणेकर, रोहिणी खडसेंसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहे.

यावेळी, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून रस्ता आडविणाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलीस आणि नेत्यांमध्ये यावेळी जोरदार संघर्ष झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
यावेळी मोर्चा वाशी महामार्गाकडे जाण्याचा प्रयत्न करण्यात आला असता खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांनाही धक्काबुक्की केली. परिणामी सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एकूणच आता हे आंदोलन काहीसे चिघळल्याचे चित्र आहे.

पेट्रोल , डिझेल प्रचंड वाढले आहे. येवढी महागाई या आधी देशात कधीच नव्हती. आपल्या पेक्षा पाकिस्तान, बांगलादेश यांची करंन्सी वरती आहे. पेट्रोल, डिझेल कमी असतानाही लोकांचा पैसा वसूलाय. २०१४ साली तेलाच्या किंमती कमी होईल, असा यांनी दावा केला होता . आता काय परिस्थिती आहे हे सर्वांपुढे आहे. अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी यावेळी दिली.